श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक)


-सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणेशाचे देवस्थान  आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. सिद्धिविनायक (सिद्धटेक) मंदिर श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. इतिहास :-पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मंदिर :-श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फुट रुंद आहे. मुर्ती उत्तराभिमुखी असून गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. भौगोलिक :-श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते. दौड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे. पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)